मोठी बातमी: मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा
जालना: मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसदाराला नोकरी देण्याची घोषणा ठाकरे सरकारमधील मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा बांधव लढा देत आहेत. मागील काही काळापासून हा लढा तीव्र होत आहे. आरक्षण मिळविण्याच्या लढ्यात अनेक मराठा बांधव तरुणांनी बलिदान दिलंय. अशा तरुणांच्या वारसदारांना नोकरी मिळणे गरेजेचे आहे, त्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितंल आहे. बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांना आज राजेश टोपे यांच्या हस्ते प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या निधीचे चेकचं वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कुटुंबियांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी आंदोलन करून पाठपुरावा केला होता.
शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले होते.