शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करा – अजित पवार

31

अवकाळी पावसाने ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली.

गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पीकांचे मोठे नुकसान केले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे.

आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा, लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा, लिंबू फळे गळून गेल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवार यांनी केली. सरकार तातडीने मदत काय करणार, केंद्र सरकारचे पथक कधी येणार आहे, असा सवालही त्यांनी केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.