अजित पवार यांचे अजब विधान: राष्ट्रवादीलाच निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो
लातूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर जिल्ह्यातल्या औसा नगर पालिकेत केलेलं वक्तव्य चांगलंच गाजतंय. औसा येथील नगरपालिकेच्या विकासकामाच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, नगरपालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. मात्र एक अट आहे. तुम्ही जर औसा नगर पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला निवडून दिले तरच हा निधी तुमच्याकडे येईल.’ अजित पवारांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं गैर आहे, असं मत जनसामान्यांमध्ये उमटत आहे.
औसा नगर पालिकेत राष्ट्रवादीच्याच पॅनलला म्हणजे डॉ. अफसर शेख यांच्या पॅनलला निवडून दिले तरच मी तुम्हाला 100 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देतो, हा माझा शब्द आहे, असं अजित पवार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. आता 100 कोटी रुपयांच्या निधी देण्याच्या अजित पवारांच्या शब्दाकडे औसा येथील जनता कशी पाहते, हे पहावे लागेल.
औसा येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही लोक उघड्यावर शौचास बसतात, ही लाजिरवाणी बाब आहे. स्वच्छता अभियानात एकदाच पारितोषिक मिळवून चालणार नाही, तर त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी जनतेनेही आपली जबाबदारी पार पाडावी.