म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मध्यरात्री ट्विट करून माहिती

ठाणे: म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहेत.

आज परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

म्हाडाच्या परीक्षा संदर्भात काही जणांनी मध्यस्थांना पैसे दिल्याचे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही ज्याही कोणत्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते हक्काने परत घ्या असे ट्विट देखील आव्हाड यांनी केले आहे. ”म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे.  आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत” असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा  आहे. काही जणांनी भरतीसाठी मध्यस्थांना पैसे दिले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यापूर्वी देखील आरोग्य खात्याच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!