स्वतःच्याच कर्माने पायावर धोंडा मारून घेतलेले मोदी सरकारच्या नावाने आणि भाजपच्या नावाने शंख का फुंकत आहेत?, केशव उपाध्येंचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द कारण्यावरुन  राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. महाविकास आघाडीकडून या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्वतःच्याच कर्माने पायावर धोंडा मारून घेतलेले मोदी सरकारच्या नावाने आणि भाजपच्या नावाने शंख का फुंकत आहेत? ,असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी एक उदाहरण दिले आहे . ते म्हणाले कि, वर्ष २०१७ साली एका सभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘चोर’ असा केला. त्यावेळी सुरतमध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेचा निकाल काल आला. ज्यात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा झाली आहे. आज लोकसभा सचिवालयाने काढलेल्या पत्रामध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाले असल्याचे सांगितले आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै २०१३ रोजी लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला निकाली काढला होता. ज्यात कोणताही खासदार, आमदार जो एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरला असेल आणि त्याला किमान दोन वर्षांचा तुरुंगवास झाला असेल, तो तात्काळ प्रभावाने आपले सभागृहाचे सदस्यत्व गमावेल असा नियम आहे.
त्या लोकप्रतिनिधीचे सर्व न्यायालयीन मार्ग संपल्यावर देखील शिक्षा कायम राहिली तर त्याला अपात्र ठरवावे हा खरा नियम आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने तो बदलून शिक्षा सूनावताच अपात्र ठरवावे हा निर्णय दिला. हा २०१३ साली घेतलेला निर्णय चुकीचा असल्याने मूळ निर्णय कायम ठेवणारा अध्यादेश तत्कालीन मनमोहन सरकारने काढला. तो राहुल गांधी यांनी जाहीरपणे फाडून टाकला व अध्यादेश रद्द करावयास लावला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे राहुल गांधी हे अपात्र ठरले आहेत…
हे सगळा बघता कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकाधिकारशाहीचा संबंध येत नाही. तरीही स्वतःच्याच कर्माने पायावर धोंडा मारून घेतलेले मोदी सरकारच्या नावाने आणि भाजपच्या नावाने शंख का फुंकत आहेत? , असा सवाल केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!