राज ठाकरे यांचं मोठं विधान; महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही
औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं काम ते या दौऱ्यातून करत असल्याचं दिसतं आहे. राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नसल्याचं सांगितलं.
पाच लाख उद्योजक देश सोडून गेल्याच्या बातमीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाच लाख व्यावसायिक जेव्हा देश सोडतात त्यावेळी नोकऱ्यांवर काय परिणाम होतो याची आपण चर्चा करत नाही. आर्यन खानची बातमी आपण 28 दिवस चालवतो, सुशांत सिंह प्रकरण, अँटालिया प्रकरण आपण लावून धरतात. पण हे पाच लाख उद्योजक कुठे गेले याचा आपल्याला शोध घ्यावा वाटत नाही. सर्व गोष्टींची अनिश्चितता असताना आपण कोणतेही विषय फिरवतो, असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुका या येतच राहतात. म्हणून निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणून शकत नाही. संभाजी नगरची निवडणूक वर्षभर पुढे जाण्याची शक्यता आहे. इतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, पण त्याचीही खात्री देता येत नाही. त्याही निवडणुका सहा आठ महिने पुढे जातील, असं चित्रं आहेत. त्यासाठी ओबीसीचे प्रकरण सुरू केलंय. केंद्राने मोजायचे की राज्याने मोजायचे यावरून मोजामोजी सुरू झाली आहे. कोणी सामोरे जायला तयार नाही. आमच्याकडे मते मागायला येऊ नका, अशा पाट्या ओबीसींनी लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ओबीसींना सामोरे जाण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.