महाराष्ट्राच्या जनतेने निर्धार केला आहे फिर एक बार, फक्त मोदी सरकार! – चंद्रकांत पाटील

अहमदनगर:  अहिल्यानगरच्या सावेडी येथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ विजयसंकल्प यात्रेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी  बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा व रालोआच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. 4 जून ही इंडी आघाडीची ‘एक्स्पायरी डेट’ ठरणार, हे तिसऱ्या टप्प्यातील मतदानाने स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले. 4 जूननंतर इंडीवाल्यांचा झेंडा उंचावण्यासाठीदेखील कोणी सापडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसप्रणीत आघाडीची खिल्ली उडविली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)मंत्री दादा भुसे आ. प्रा. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, भानुदास बेरड आदी यावेळी उपस्थित होते .

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, यावेळची निवडणूक संतुष्टीकरण आणि तुष्टीकरण यांच्यातील लढाई आहे. देशवासीयांना संतुष्ट राखण्यासाठी परिश्रम करण्यासाठी भाजपा-एनडीए आघाडी प्रयत्नशील आहे, तर इंडी आघाडीने मात्र व्होट बँकेच्या तुष्टीकरणासाठी ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसने तर आपल्या संपूर्ण जाहीरनाम्यालाच मुस्लिम लीग बनवून टाकले आहे. विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, प्रतिष्ठा हे भाजपा – एनडीए चे मुद्दे आहेत. यापैकी एकाही मुद्द्यावर बोलण्याची काँग्रेसची तयारीही नाही. गरीब कल्याणाच्या मुद्द्यावर बोलण्याची वेळ आली तर काँग्रेस शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून बसून राहील, असा टोलाही त्यांनी मारला. कारण, त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नाहीत. गेल्या 50 वर्षांत गरीबी हटविण्याची खोटी आश्वासने देऊन काँग्रेसने गरीबांचा मोठा विश्वासघात केला आहे, तर चार कोटी पक्की घरे, 50 कोटी गरीबांना जनधन खाती, 80 कोटी गरजवंतांना मोफत धान्याची सुविधा, शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीतून तीन लाख कोटींचे साह्य, पीक विमा योजनेतून दीड लाख कोटींची भरपाई मिळण्याची हमी मोदी देतात, पिकांच्या हमीभाव वाढविण्याची हमी देतात, आणि काँग्रेस मात्र तोंडावर पट्टी बांधून गप्प बसते, असा हल्ला त्यांनी चढविला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह संपूर्ण संविधान सभेने ज्याला विरोध केला होता, तेच पाप आता काँग्रेस आणि इंडी आघाडी करू पाहात आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण संविधानास मान्य नाही, तरी इंडी आघाडी मात्र, आपल्या मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संविधानच बदलण्याचा या आघाडीचा इरादा आहे, असा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला. मात्र, जनता काँग्रेसची ही चाल यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आता इंडी आघाडीचे नेते हताश झाले आहेत, आणि देशाबाहेरही त्यांची निराशा दिसू लागली आहे. सीमेपलीकडची काँग्रेसची बी टीम आता सक्रिय झाली असून देशाबाहेरच्या शक्ती काँग्रेसची उमेद वाढविण्यासाठी सरसावल्या आहेत. त्या मोबदल्यात काँग्रेस पाकिस्तानला देशातील दहशतवादी हल्ल्यांपासून क्लीन चिट देत आहे, असा गंभीर आरोप मोदी यांनी केला. महाराष्ट्राच्या भूमीत, मुंबईत 26-11 चा दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच केला होता, हे सर्वजण जाणतात. या हल्ल्यात आपले जवान हुतात्मा झाले, अनेक निर्दोष लोकांची हत्या झाली, हे संपूर्ण जग जाणते, पाकिस्तानने देखील ही बाब मान्य केली आहे, पण काँग्रेस मात्र, दहशतवाद्यांना निर्दोषत्वाची प्रमाणपत्रे वाटत सुटली आहे, असे ते म्हणाले. या दहशतवादी हल्ल्यांबाबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचे वक्तव्य धोकादायक आहे. सगळे काँग्रेसी आता दहशतवादी कसाबची बाजू घेत आहेत. त्या हल्ल्यात मरण पावलेल्या सर्व निर्दोष लोकांचा हा अपमान आहे, दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांचा अपमान आहे, या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांचा अपमान आहे. तुष्टीकरणाच्या धोरणासाठी काँग्रेस किती खालच्या थराला जाणार, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रातून काँग्रेस व इंडी आघाडीला एकही जागेवर विजय मिळता कामा नये, असे सांगून गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने सुरक्षा व विकासाबाबत दिलेल्या हमीचा मोदी यांनी पुनरुच्चार केला.

महाराष्ट्रातील अहमदनगर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जाहीर सभेस अलोट गर्दी जमली होती. यावरून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल साईट्सवर पोस्ट करत म्हटले आहे कि, नरेंद्र मोदीजी यांच्या जाहीर सभेस जमलेली ही अलोट गर्दी सांगत आहे, महाराष्ट्राच्या जनतेने निर्धार केला आहे फिर एक बार, फक्त मोदी सरकार!

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!