केंद्र व कर्नाटक सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी; छत्रपती संभाजीराजेंची मागणी
कोल्हापूर: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या घटनेवर आता संभाजीराजे छत्रपती यांनी निषेध व्यक्त केला आहे. बंगळुरुची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. असे म्हणत संभाजीराजेंनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील संभाजीराजेंनी केली आहे.
संभाजीराजेंनी ट्विट करत म्हटले आहे की, “संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.” असे ट्विट संभाजीराजेंनी केले आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
मंत्री छगन भुजबळ यांनीही याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. भुजबळ म्हणाले की, नरेंद्र मोदी हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आले आहेत. मात्र, त्यांच्या भाजपच्या राज्यात या नराधमांनी हे कृत्य केले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आमची मागणी आहे. पुतळ्याला अभिषेक करण्यासाठी गेलेल्या लोकांना अडविणे योग्य नाही. आम्ही छत्रपतींना दैवत मानतो. याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.