उशीरा का होईना पण ईडी सरकारकडून बऱ्याच दिवसांनी बरी कृती झाली, भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावरून सुप्रिया सुळेंचा टोला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर उपहासात्मक टीका केली आहे. त्यांनी म्हटले कि, ज्या व्यक्तीने सातत्याने महाराष्ट्राचा आणि राज्यातील महापुरुषांचा, राज्याच्या स्वाभिमानाचा अपमान केला त्यांचा राजिनामा मंजूर झाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांचे आभार मानले. उशीरा का होईना पण ईडी सरकारकडून बऱ्याच दिवसांनी बरी कृती झाली, असा टोला त्यांनी लगावला. माध्यमांसमोर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा निर्णय या पूर्वीच होण्याची गरज होती. महाराष्ट्राच्या जनतेचा रोष आणि विरोधी पक्षाने मांडलेली भुमिका पाहून सत्ताधाऱ्यांना हे करावे लागले. भगत सिंह कोश्यारी यांना विश्वासाच्या नात्याने आम्ही नेहमी मानसन्मान दिला. आमची केवळ ऐवढीच अपेक्षा होती की, गव्हर्नर पदावर बसणाऱ्या माणसांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम करावे मात्र त्यांनी संविधानाबाहेर जाऊन महाराष्ट्राला कमी दाखवण्याचे काम केले. राज्याचा अपमान करण्यासाठी एक अदृश्य शक्ती कुठे तरी काम करते हे सतत दाखवण्यात आले.
दरम्यान नवीन नियुक्त झालेल्या महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे सुप्रिया सुळेंनी स्वागत केले. त्यांचे संसदेतील सुसंस्कृतपणे वागणे आम्ही जवळून पाहीले आहे. संसदेत एक जबाबदार खासदार म्हणून त्यांनी काम केले आहे तसेच जबाबदार राज्यपाल म्हणून त्यांनी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यात आल्यावर सर्वप्रथम विरोधी पक्षाला बोलावून महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा कसा येईल यांचा प्रयत्न राज्यपालांनी करावा, असे मत त्यांनी व्यकत्त केले.