ताई पहिल्या 4 मंत्र्यांमध्ये होत्या, दादा 32 व्या नंबरचे मंत्री असल्यानं निधी आणण्याची ताकद नाही; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत 32 वा क्रमांक लागल्याची माहिती नुकतीच उघड झाली. या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे  यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. त्या म्हणाल्या मी मंत्रीपदी होते तेव्हा पहिल्या चार मंत्र्यांमध्ये माझा समावेश होता. असं 32 व्या क्रमांकापर्यंत माझं मंत्रीपद कधी गेलं नाही.

बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमातील भाषणात त्या म्हणाल्या, तुमच्या ताई जेव्हा निवडून आल्या, मंत्री झाल्या. तेव्हा त्या पहिल्या चार मंत्र्यांमध्येच होत्या. असं 32 व्या नंबरवर त्या कधी गेल्या नाही.’ उत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचा 32 क्रमांक लागल्यामुळे पंकजा मुंडे यांनी ही टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी प्रचारसभेत दिलेल्या आश्वासनांवरही त्यांनी तोंडसुख घेतले.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, ‘ निवडणुकीत निवडून आल्यानंतर विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देऊ, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले. विशेष म्हणजे, पाटोदा, शिरूर, आष्टी, केज आणि वडवणी अशा पाचही ठिकाणी त्यांनी ही घोषणा केली. एवढा 500 कोटींचा निधी एका झटक्यात द्यायचं म्हणतायत हे लोक तर मग दोन वर्षे काय टाळ पिटत होते का? ते पैसे द्यायची यांची ताकदच नाही’.

ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा आदेश आल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री गप्प का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. त्या म्हणाल्या, ‘ तुम्ही निधीची घोषणा करत असाल तर त्या ओबीसी मागास आयोगासाठी आधी निधी आहे. ओबीसीचं आरक्षण रद्द झालं, पालकमंत्री म्हणून एक तरी वक्तव्य केलं का यांनी? कोणत्या तोंडानी तुम्ही लोकांना मदत मागायला येताय?

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!