शरद पवार हे देशातील मोठे नेते, त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही – आमदार महेश लांडगे

3

पिंपरी: भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहरातील दोन्ही आमदारांनी (चिंचवडचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे) शहराची वाटणी केली आहे, अशी टीका शनिवारी (ता.१६) शरद पवार यांनी जगताप व लांडगे यांचे नाव न घेता केली होती. त्यावर दोन्ही आमदारांनी सावध व संयमी भूमिका  घेतली आहे. आ. लांडगेंनी पंकजा मुंडेसारखी प्रतिक्रिया दिली. तर, आ. जगताप यांनी पवारांची टीकेची बातमी वाचून उत्तर देईन, असे सांगितले.

पवारसाहेब हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही,असे आ. लांडगे म्हणाले. मात्र, शहराच्या विकासावर कुणाला शंका असेल, त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी. त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना पवार यांनी भाजप, त्यांचे केंद्रातील सरकार, राज्यातील नेते तसेच पंकजा मुंडे आणि शहरातील दोन्ही आमदारांवर शनिवारी हल्लाबोल केला होता. राज्य सरकार पडणार या भुमिकेतून बाहेर पडा,असा  घरचा आहेर मुंडे यांनी दसरा मेळाव्यात दिला होता. त्याबाबत विचारणा केली असता त्या एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत,  असे सांगून त्या प्रश्नाला पवार यांनी बगल दिली होती.

दरम्यान, मुंडे यांनी आपल्यावरील पवारांच्या टीकेवर लगेचच मुंबईत पलटवार केला. शरद पवार माझ्यापेक्षा मोठे आहेतच. यात वाद नाही. पण, त्यांच्या बोलण्याने मी लहान होत नाही वा मोठीही होणार नाही, असा टोला मुंडे यांनी लगेच लगावला होता. तशीच काहीशी प्रतिक्रिया आ. लांडगे यांनीही त्यांच्यावर पवारांनी केलेल्या टीकेवर दिली. शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही,  असे आ. लांडगे म्हणाले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.