….तरीही परळीच्या जनतेनं तुम्हाला तुमची औकात दाखवली; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
बीड: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत ३२ वा क्रमांक लागला. यावरूनच आता भाजपा नेत्या आणि धनंजय मुंडेंची बहीण पंकजा मुंडेंनी भर सभेत धनंजय यांना सणसणीत टोला लगावला. “मी मंत्रीपदी होते तेव्हा पहिल्या चार मंत्र्यांमध्ये माझा समावेश होता. थेट ३२व्या क्रमांकापर्यंत माझं मंत्रीपद कधीच गेलं नाही,” असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर तोंडसुख घेतले. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
“जेव्हा तुम्ही २०१९ मध्ये निवडणूक लढवली तेव्हा तुम्ही ग्रामविकास मंत्री होत्या. राज्याच्या कॅबिनेट मंत्री होत्या, तरीही परळीच्या जनतेनं तुम्हाला तुमची औकात दाखवून दिली. २०१९ चा पराभव तुम्ही विसरलात का?, परळीच्या जनतेनं २०१९ मध्ये तुम्हाला औकात दाखवली ते विसरलात का,” अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तराने पुन्हा एकदा राजकारणातील या बहीण भावाच्या जोडीत शाब्दिक युद्ध रंगणार का असा सवाल निर्माण झाला आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर परखड टीका केली. “तुमच्या ताई जेव्हा निवडून आल्या, मंत्री झाल्या. तेव्हा त्या पहिल्या चार मंत्र्यांमध्ये होत्या. असे ३२ व्या नंबरवर मी कधीच गेले नाही,” असे त्या म्हणाल्या. याशिवाय जिल्ह्यासाठी मिळवलेल्या निधीवरूनही पंकजांनी निशाणा साधला.
“निवडणुकीत निवडून आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देऊ, असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिले होते. एक नव्हे तर पाटोदा, शिरूर, आष्टी, केज आणि वडवणी अशा पाचही ठिकाणी त्यांनी ही घोषणा केली होती. एका झटक्यात ५०० कोटी रुपये द्यायला तयार होतात, पण दोन वर्ष उलटूनही निधी मिळाला नाही. मग दोन वर्षे काय टाळं पिटत होते का? असा सवाल करत ते पैसे द्यायची यांची ताकदच नाही,” असा टोला पंकजांनी लगावला.