वेळ आलीच तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन; भगवानगडावरून पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

7

बीड: आज कुठल्याही पक्षाचं राजकारण नाही..हा मेळावा केवळ लोकांना दिशा देण्यासाठी आहे. तुम मुझे कबतक रोकोगे…अशी कविता ऐकवत खास शैलीत पंकजा मुंडे यांनी जनतेला संबोधित केले. या मेळाव्याला जशी आई मुलाची दृष्ट काढते. तसा मी तुमच्यावरून पदर ओवाळला. वेळ आली तर तुमच्यावर जीव सुध्दा ओवाळून टाकेन, तुमच्याशिवाय कोण आहे मला… असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. आज १५ ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षानंतर हा दसरा मेळावा साजरा केला जातोय. तसेच गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणासंबंधी भाजप नेत्या पंकजा मुंडे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे आज पंकजा मुंडे तोफ कोणावर धडाडणार? याकडे सर्वांच लक्ष आहे.

पंकजा मुंडे मेळाव्यात बोलताना म्हणाल्या की, “आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा वाटू देऊ नका, अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मतांचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते.” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. माझ्यामागे मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवानबाबांची मूर्ती आहे. हे अत्यंत पवित्र स्थान आहे. या स्थानावर उच्चार करायचा नाही, असा कुठलाही शब्द मी उच्चारणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीचा उल्लेख केल्यानं भगवान बाबांची मान खाली जाईल, अशा कुठल्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायचा नाही. अशा कुठल्या प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही.”

Get real time updates directly on you device, subscribe now.