भाजपाचे आमदार आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

अहमदनगर: भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोना विषाणुची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. विखे पाटील यांनी गेल्या काही दिवसांत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. अहमदनगर येथील रुग्णालयात त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये त्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला देखील ते उपस्थित होते. धक्कादायक म्हणजे काल अहमदनगरमध्ये माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या मुलाच्या लग्नात देखील उपस्थित होते. या ठिकाणी ते विनामास्क वावरताना दिसून आले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत या लग्न सोहळ्यात अनेक बडे नेते देखील होते. विखे पाटील यांच्यासोबत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.

आपली कोरोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर विखे पाटील यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.”