ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही – खासदार छत्रपती संभाजीराजे

पुणे: ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्याशिवाय निवडणूका होवू देणार नाही असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. पुण्यातील राजगुरूनगर येथे( दि५ ) ‘एक क्षण हूतात्म्यांसाठी’ या उपक्रमासाठी हुतात्मा स्मृती स्थळाला भेट देण्यासाठी आले होते.

यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका मांडली. संभाजीराजे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार इम्पेरियल डाटा गोळा करून पुढील प्रक्रिया करायची आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून योग्य तोडगा काढण्याची गरज आहे.

ओबीसी आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय राज्यातल्या निवडणुका होवू नयेत हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय निवडणुकाच होवू देणार नसल्याचा इशारा देऊन संभाजीराजे म्हणाले, राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होणे आवश्यक आहे. कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता याबद्दल निर्णय होणे अपेक्षित आहे.  तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संभाजीराजे यांनी सुरू असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलकांनी यावेळी त्यांना निवेदन दिले.