“शरद पवारांच्या ‘या’ एका वाक्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं”
मुंबई: राज्याच्या राजकारणात कधीही शक्य नसलेलं सत्तासमिकरण अस्तित्वात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तिन्ही पक्ष सत्ताशकट मोठ्या कौशल्याने हाकत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाची तत्कालीन परिस्थिती तसेच त्यावेळचे डावपेच यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढलं होतं असं सांगितलंय.
एका मराठी वर्तमानपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाची परिस्थिती तसेच त्यावेळी काय घडामोडी घडल्या याबाबत सांगितलं. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून धडपड सुरु होती. तर दुसरीकडे शिवसेना मुख्यंत्रिपदावर अडून बसली होती. यावेळी सरकार स्थापन्यासाठी भाजपला बहुमताचा अकडा गाठण्यासाठी जिकरीचे होऊ लागले.
याच गोष्टीचा फायदा घेत शरद पवार यांनी मोठा राजकीय डाव टाकला. याच राजकीय खेळीबद्दल त्यांनी भाष्य केलं. “देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची मदत हवी असेल तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करु, असे मी त्यावेळी म्हणालो होते. ते माझं एक वाक्य शिवसेना तसेच भाजपमध्ये अंतर वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरलं,” असं शरद पवार यांनी सांगितलं.
याचबरोबर पवार यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी कार्यक्रमाबाबतही भाष्य केलं. मी अजित पवार यांना शपथेसाठी पाठवलं नव्हतं. मी पाठवलं असतं तर सरकार स्थापनच केलं असतं. असं अर्धवट काम सोडलं नसतं, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत शपथविधी घेतला होता. यामागे शरद पवार यांचा हात असल्याचं म्हटलं जातं. त्यांच्या वरील वक्तव्यानंतर आता शरद पवार यांची यामध्ये कोणतीही भूमिका नव्हती हे स्पष्ट झालं आहे.