राज्यात लॉकडाऊनची स्थिती येतेय, त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार – विजय वडेट्टीवार
मुंबई: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसत आहे. दैनंदिन वाढणाऱ्या कोरोना रुग्णामुळे महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. रोज दुपटीने वाढणाऱ्या कोरोना बाधितांमुळे आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार सतर्क झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागणार का? यावर सर्वत्र चर्चा रंगली आहे. तर, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचे संकेत दिले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे. परंतु, लॉकडाऊनबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती विस्फोटक आहे. रुग्णवाढीचा आलेख वेगाने वाढत आहे. रुग्ण दुप्पटीचा वेग एका दिवसावर आला आहे. रुग्णवाढीचा झपाटा पाहता जर आपण वेळीच निर्बंध घातले नाही, तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. तसेच ज्या वेगाने हा आजार पसरतोय ते पाहता आता नियम पाळण्याची जबाबदारी जनतेवर आहे.
वडेट्टीवार म्हणाले, ‘जर नियम पाळले गेले नाहीत तर लॉकडाऊनला पर्याय उरणार नाही. त्यामुळे निमय पाळायचे आहेत की पाळू नये, हे लोकांनी ठरवावे. लोकल काही काळापूर्वीच सुरू केल्यात आणि रुग्णवाढ झाली आहे. आता तिसरी लाट आली आहे. आता पुन्हा एकदा लोकल आणि शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल तो सर्वांचा विचार करुन घेतला जाईल. त्याचबरोबर लॉकडाऊनची स्थिती आता येत आहे. ते कधी करायचं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.’ असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.