पत्रकार शशिकांत वारिशे हत्येचा तपास नि:पक्षपातीपणे करा, पोलिसांना ‘फ्री हॅण्ड’ द्या, तपासात राजकीय हस्तक्षेप नको – अजित पवार

राज्यात रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली, ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. वारिशे यांची हत्या करणारा संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो वापरुन रिफायनरीचे समर्थन करत होता, ही गंभीर बाब असल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सभागृहात केला. पत्रकार वारिशे यांच्या हत्येची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, पोलिसांना तपासात ‘फ्री हॅण्ड’ देण्यात यावा, तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यात पत्रकारांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला असून पत्रकार वारिशे यांच्या हत्येच्या मागचा मास्टरमाईंड शोधण्याची मागणी अजितपवारांनी केली.
कोकणात रिफायनरी विरोधात लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या गाडीला अपघात करुन त्यांना फरफटत नेले. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. या हत्येतील संशयित आरोपी हा रिफायनरीचा समर्थक आहे. त्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो वापरुन रिफायनरीच्या जाहिराती केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरला आहे त्यामुळे त्यांच्या संबंधित कोण आहे का? याचा तपास व्हायला हवा. माझा आरोप नाही मात्र ही बाब अत्यंत गंभीर आहे, असेही अजित पवार म्हणाले.
विरोधात लिहितो म्हणून पत्रकाराची हत्या होणे, हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करुन यामागच्या मास्टरमाईंडचा शोध घेण्याची आक्रमक मागणी अजित पवारांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!