नरेंद्र मोदी व भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली – नाना पटोले

43

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हे ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला? त्यामागे काय हेतू होता? असा प्रश्न उपस्थित करून पंजाबातील घटनेनंतर भाजप नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानाचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान व त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे. हे पाहता शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने हे सर्व ठरवून केल्याचे स्पष्ट दिसत असून नरेंद्र मोदी व भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. त्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी सविस्तर प्रकाश टाकलेला आहेच, परंतु भाजपकडून जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देत काँग्रेसला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. या घटनेला भाजपने एक इव्हेंट बनवले आहे. पंतप्रधानांची सुरक्षा ही एसपीजीकडे असते तसेच अनेक महत्वाच्या केंद्रीय यंत्रणा त्यात सहभागी असतात म्हणून भाजपने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोरच आंदोलन करून त्यांना जाब विचारावा. आम्ही कालच या संदर्भात अमित शाह यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व गृहमंत्रालय हे गप्पच आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याजवळ जे लोक गेले होते ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते, याचे व्हीडिओ प्रसार माध्यमांनी दाखवले आहेत. यात नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. एका केंद्रीय मंत्र्यांने पंतप्रधानांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचे केलेले विधान हास्यास्पद आहे. वय झाल्यानंतर लोकांची नजर कमी होते परंतु यांचे वय वाढल्यानंतर नजर वाढल्याचे दिसते, असा टोला नारायण राणे यांचे नाव न घेता पटोले यांनी लगावला.

Get real time updates directly on you device, subscribe now.