मागील अठरा दिवसापासून गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे, थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रकटले
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज(गुरूवार) निवडणूक होती. यामध्ये बँकेच्या अध्यक्षपदी मनिष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचे अभिनंदन करण्यासाठी नितेश राणे बँकेत दाखल झाले आहेत. तब्बल १८ दिवासानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर आले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून नितेश राणे दूर होते. मात्र, १८ दिवसानंतर त्यांनी बँकेमध्ये हजेरी लावल्यानंतर चर्चेला उधाण आलंय.
संतोष परब हल्लाप्रकरणी त्यांच्यावर अटकपूर्व जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. परंतु ही सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने सोमवारपर्यंत नितेश राणेंना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाची वेळ संपल्यामुळे १७ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली असून याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे अटकेची त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु हायकोर्टाने त्यांना अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षणाचा दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस होता. जिल्हा बँकेवर अध्यक्षपद मनीष दळवी झाले असून भाजपचे वर्चस्व आले आहे. परंतु नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे.