पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाड्यांचा ताफा पंजाबमध्ये एका फ्लायओव्हरवर वीस मिनिटे अडकणे हा त्यांच्या हत्येसाठी घातपाताचा पूर्वनियोजित प्रयत्न होता हे एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे स्पष्ट झाले आहे. देशाच्या सुरक्षिततेविषयीच्या या गंभीर प्रकाराबाबत भारतीय जनता पार्टी जनजागरण करेल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत घडलेली घटना किरकोळ असल्याचे सांगून काँग्रेसचे नेते खिल्ली उडवतात. तथापि, स्टिंग ऑपरेशनमुळे स्पष्ट झाले आहे की, पंतप्रधानांच्या मार्गावर आंदोलन होणार याची खबर स्थानिक पोलिसांनी दोन तीन दिवस आधी उच्च पदस्थांना देऊनही कारवाई करू नका असा सूचना देण्यात आल्या. ही घटना घडली तेथून पाकिस्तानची सीमा दहा किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण ड्रोन हल्ल्याच्या टप्प्यात आहे.
हा घातपाताचा आणि पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न होता हे आता तरी काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या पंजाब सरकारने मान्य केले पाहिजे. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाची काँग्रेस नेते खिल्ली उडवतात. देशाच्या सुरक्षिततेविषयीच्या गंभीर विषयाची खिल्ली उडवणे चिंताजनक आहे, असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, या विषयात पंजाबच्या काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांना ब्रिफिंग केले. प्रियांका गांधी या कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना त्यांना मुख्यमंत्र्यांनी माहिती देणे म्हणजे हा प्रकार काँग्रेस सरकार आणि पक्षाच्या समन्वयाने झाला का, अशीही शंका उत्पन्न होते.