नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन
मुंबई: संतोष परब हल्लाप्रकरणातील कथित आरोपी आणि भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळाला आहे. तर याच प्रकरणातील आरोपी मनीष दळवी यांना मात्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा नितेश राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी नितेश राणे यांना घालण्यात आल्या आहेत.
यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानेही नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याठिकाणीही त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे आता नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
संतोष परब हल्लाप्रकरणात कणकवली पोलिसांनी अटकेच्या हालचाली सुरु केल्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर तब्बल १५ दिवस नितेश राणे अज्ञातवासात होते. अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर ते कणकवलीत प्रकटले होते. त्यावेळी नितेश राणे यांनी आपण १७ जानेवारीनंतर बोलू, असे म्हटले होते. नितेश राणे यांच्या वकिलांनी त्यांना अटकपूर्व जामीन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आता उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनाचा अर्जच फेटाळल्याने नितेश राणे यांना पोलीस अटक करणार किंवा त्यांना पुन्हा अटकेपासून संरक्षण मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.