मराठी भाषेतील समृद्ध साहित्य हिंदीत भाषांतरित करण्यासाठी साहित्यिक, हिंदी सभेने पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

9

मुंबई: मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. मराठी वृत्तपत्रांमधील व विशेषतः पुरवण्यांमधील लेख अतिशय अभ्यासपूर्ण व अभिरुचीसंपन्न असल्याचे आपण पाहिले आहे. हे समृद्ध साहित्य व लेख हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्यातील पत्रकार, साहित्यिक तसेच मुंबई हिंदी सभेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने सन १९४४ साली सुरु झालेल्या मुंबई हिंदी सभा या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला मुंबई हिंदी सभेचे कुलपती तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय हिंदी संचालनालयातील उपसंचालक राकेश शर्मा, पत्रकार वर्षा सोळंकी, सभेचे कुलगुरु विजय परदेशी, महासचिव सूर्यकांत नागवेकर व कोषाध्यक्ष देवदत्त साळवी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, स्वामी विवेकानंद बंगाली भाषिक असले तरीही ते शिकागो येथे उत्कृष्ट इंग्रजी भाषेत बोलले व अल्मोडा येथे आले असताना लोकांशी हिंदी भाषेतून बोलले. महर्षी दयानंद यांनी देखील हिंदी भाषेत काम सुरु केले. महात्मा गांधी यांनी देशाला जोडण्यासाठी हिंदुस्तानी भाषेचा पुरस्कार केला, यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असे सांगताना हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारात बिगर हिंदी भाषिकांचे योगदान कितीतरी पटीने मोठे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली पाहिजे, मात्र मराठी येत नसेल तर हिंदी बोलली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

हिंदी ही परस्परांना जोडणारी भाषा : छगन भुजबळ

हिंदी भाषा तोडणारी नसून परस्परांना जोडणारी भाषा असून हिंदी भाषेमुळे आपल्याला उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यातील लोकांशी सहजपणे संवाद साधणे शक्य होत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. हिंदी भाषा समृद्ध करण्यामध्ये अमृता प्रीतम, महादेवी वर्मा, मुन्शी प्रेमचंद आदी साहित्यिकांचे जसे योगदान आहे, तसेच हिंदी चित्रपट सृष्टी, हास्यकवी व सामान्य लोकांचे योगदान असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. हिंदी भाषेचा प्रचार प्रसार देशभर होऊन देश जोडला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.