आवाजी मतदानानं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेणं घटनाबाह्य; राज्यपालांचं सरकारला पत्र

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा रेंगाळण्याची शक्यता आहे. आवाजी मतदानानं निवडणूक घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं राज्य सरकारला पत्राद्वारे सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रविवारी भेट घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला. त्यावर कायदेशीर बाबी तपासून उद्या सांगतो, असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाला दिलं होतं. महाविकास आघाडीच्या पत्राला राज्यपालांनी सोमवारी उत्तर दिलं आहे. राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं सांगितलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलण्यात आला होता. हा नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला पत्राद्वारे कळवलं आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या पत्रानंतर आता महाविकास आघाडी सरकार पुन्हा तिसरं पत्र पाठवणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांची दोन शिफारस पत्रे दिली आहेत. तिसऱ्या पत्रात कायदेशीर बाबींवर राज्यपालांकडून शंका उपस्थित केली जाते आहे. त्याबाबत पत्रात सविस्तर मुद्दे नमुद केले जाणार आहेत.