चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणतात, त्यांना माझ्या शुभेच्छा

सातारा: सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांना आज सणसणीत टोला हाणला. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली.

महाविकास आघाडीनं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिलेली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी या संदर्भात राज्यपालांची भेट घेतली असता अभ्यास करून निर्णय घेण्याचं आश्वासन राज्यपालांनी दिलं. त्यावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर तिरकस टीका केली आहे. तर, चंद्रकांत पाटील यांनीही त्यास उत्तर दिलं आहे.

‘विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपालांनी दोन वेळा निवडणुकीच्या तारखा देऊन सुद्धा महाआघाडी सरकारने निवडणूक घेतली नाही, हा राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान आहे आणि याच एका मुद्द्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं विधान पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केलं होतं. साताऱ्यात पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपल्या खास शैलीत यावर प्रतिक्रिया दिली.

‘चंद्रकांत पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यातील विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला स्पष्ट बहुमत आहे. राज्याला स्थिर सरकार देण्यात उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी यशस्वी झाले आहेत, त्यामुळं जे अस्वस्थ आहेत, ते लोक अशा प्रकारची विधानं करत असतात. त्यांनी यापूर्वीही अशी विधानं अनेकदा केली आहेत, पण राज्यातील सर्वसामान्य जनतेनं त्याची नोंद घेतलेली नाही. त्याचा काही परिणाम होत नाही. त्यामुळं मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही,’ असं शरद पवार म्हणाले.