आईच्या साडीने गळफास घेऊन एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या

सोलापूर: एसटी संपामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अनेक कर्मचाऱ्यांचे आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी संप चिघळल्यानं अनेकांना वाईट परिस्थितीचाही सामना करावा लागला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. अशातच अजूनही कर्मचाऱ्यांचा संप काही मिटेना. त्यामुळे सरकारनंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

अनेक मागण्यांसह एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही पूर्णपणे संपायचं नाव घेईना. त्यामुळे महामंडळाने संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. दिवसेंदिवस हा संप चिघळतच चालला आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. यातच काही आगारांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही आगारातील कर्मचारी अजूनही संप मागे घेण्यास तयार नाहीत.

अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आईच्या साडीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. अमर तुकाराम माळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अवघ्या 20 वर्षांचा होता. सोलापूरमधील या अमरने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली. मात्र संपामुळे दोन तीन महिने पगार नाही, काम बंद आहे तुला पैसे कुठून देऊ असं वडिलांनी हताश होऊन सांगितलं.

अमरसोबत बोलणं झाल्यावर ते संपात सहभागी होण्यासाठी निघून गेले. अमरही त्याच्या कामासाठी बाहेर गेला. घरी परतल्यावर आईने त्याला जेवायला सांगितले. मात्र त्यानं आराम करायचाय म्हणत आपल्या खोलीत जाऊन हे धक्कादायक पाऊल उचललं. बराच वेळ झाला तरी अमर खोलीच्या बाहेर आला नाही म्हणून आईनं त्याला आवाज दिला. मात्र समोरुन कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आईने आमरच्या मोठ्या भावाला बोलावलं. त्यानंही हाक मारल्या पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मोठ्या भावानं खिडकीतून आत पाहिलं असता अमरने आईच्या साडीने गळफास घेतला होता.

माझा पगार झाला नसल्यानं तुला पैसे देता आले नाहीत असं सांगत अमरच्या वडिलांनी हंबरडा फोडला. या घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!