तळेगाव हादरले! 11वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हत्याकांडाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पिंपरी-चिंचवड मधील तळेगावमध्ये 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास या मुलाच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे तळेगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दशांत अनिल परदेशी असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. दशांतची हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेनंतर दशांतचे वडील अनिल परदेशी यांनी याप्रकरणी तळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बुधवारी मध्यरात्री उशिरा दशांत बाईक घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरीच आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घरातील व्यक्ती आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दशांत परदेशीची हत्या कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही. दशांतची हत्या कोणी केली आणि का केली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. दशांतच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडण्यात आल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याने त्याची हत्या कोणी केला यासंदर्भातील गूढ वाढलेय. पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या केली असावी का? याचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.