देशभरातील पीएफआय कारवाईचे पुण्यात पडसाद…आंदोलकाकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

पुणे: देशभरात ईडी, सीबीआय आणि एटीएस ने महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. या कारवाईत 100 पेक्षा अधिक पीएफआय च्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र पुण्यातील कारवाईनंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन करताना आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. यावर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

इस्लामिक संघटना म्हणून नावारूपास आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्वपूर्ण ठिकाणांवर गुरुवारी सकाळी राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलीस यांनी छापे टाकले होते. या विरोधात पुण्यात शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. एनआयए केलेल्या कारवाईविरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनात ही घोषणाबाजी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झालेल्या आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या. या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि 60 ते 70 पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.