शिवाजी पार्क शिवसेनेचेच; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला शिवसेनेला परवानगी
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्याबंडानंतर राज्यात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरुन जोरदार राजकारण बघायला मिळाले आहे. शिवसेनेकडून महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर महापालिकेकडून शिंदे गट आणि शिवसेना या दोन्हीचा सुद्धा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर शिवसेनेकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आता कोर्टाने निकाल देत शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
उच्च न्यायालयानं आज दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले. तसंच, मैदानाला परवानगी नाकारणाऱ्या मुंबई महापालिकेचंही म्हणणं ऐकून घेतलं. शिवसेनेनं दसरा मेळाव्याची परंपरा व आधीच्या शासन निर्णयाचा आधार घेत नेमका युक्तिवाद केला. शिवसेनेचा अर्जही शिंदे गटाच्या आधी आला होता. उच्च न्यायालयानं हे सगळे मुद्दे विचारात घेतले. कायदा-सुव्यवस्थेचं महापालिकेनं दिलेलं कारण वस्तुस्थितीला धरून नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.
राज्य सरकारनं 45 दिवसांसाठी शिवाजी पार्क विविध कार्यक्रमांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. त्यानुसार शिवसेनेचा अर्ज आला आहे. अर्ज फेटाळून महापालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला आहे, असं उच्च न्यायालयानं म्हटलं. ‘शिवसेना कुणाची’ याचा दसरा मेळाव्याच्या परवानगीशी कुठलाही संबंध नाही, असंही न्यायालायनं यावेळी नमूद केलं.