राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीकडून नोटीस… 20 मार्च रोजी होणार चौकशी

उद्धव ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी नोटीस पटवली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. राजन साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. येत्या २० मार्च रोजी या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. साळवी यांना या पूर्वी तींन वेळा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

राजन साळवी यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले कि, आज सकाळी माझी पत्नी अनुजा यांना एसीबीची नोटीस आली आहे. यासोबतच मोठा भाऊ दीपक साळवी आणि त्यांच्या पत्नीला देखील नोटीस आली आहे. या नोटीस मध्ये असे नमूद करण्यात आले कि २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. साळवी पुढे म्हणाले कि सर्वसामान्य कुटुंबातून आलेला शिवसैनिक आमदार झाला आहे. त्याला त्रास देण्याचं काम सुरु आहे.

साळवी यांनी बोलताना असा आरोप देखील केला कि, उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांना वेगवेगळ्या सरकारी संस्थांकडून नोटिसा येत आहेत. भाजप किंवा शिंदे गटात गेले त्यांना नोटिसा येत नाहीत. तिकडे गेले कि, वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतात आणि आम्हीच फक्त दोषी ठरवले जातो. केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे .  केंद्रीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत.   त्यामुळे आम्हा सर्वांना त्रास देण्याचा प्रयन्त केला जात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून राज साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. तीन वेळा अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजर राहिलेले आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकाचीही  चौकशी करण्यात आली आहे. मला नोटीस पाठवल्यांनंतर माझ्या कुटुंबियांना नोटीस पाठवण्याची गरज काय असा सवालही त्याची उपस्थित केला.