आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक टीका, म्हणाले….
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात आदित्य ठाकरे यांनी जनआक्रोश मोर्चा काढला आहे. या जनआक्रोश मोर्चात त्यांनी शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांलाच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, विश्वासघाताने त्यांच्याकडे सत्ता आली होती. अडीच वर्षे या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांच्या घरात होते आणि ते स्वत:ही कॅबिनेट मंत्री होते. पण जेव्हा महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या आधाराची गरज होती, लोकांना ऑक्सीजन बेड मिळाले नाहीत. अनेक लोकांचा उपचाराविना मृत्यू झाला, अशा वेळी यांनी लोकांना आधार देणे आवश्यक होते. पण त्यावेळी आदित्य ठाकरे घराबाहेर पडले नाहीत. आता सगळे त्यांच्या हातून गेले असताना ते लोकांमध्ये जात आहेत. याचा त्यांना काही उपयोग होईल, असा सवालत त्यांनी केला आहे.
जनआक्रोश मोर्चात आदित्य ठाकरेंची टीका
तुम्ही खोके घेऊन तुम्ही एकदम ओके झालात, पण आमच्या रोजगाराचे काय, असा प्रश्न तरुणांचा आहे. फक्त शिवसेनेच्या नाही, तर महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. खोके सरकारचे लक्ष त्यांच्या गटात कोण येतेय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतेय, याकडे कुणाचेच लक्ष नाहीय, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.