मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदारांना आवाहन… पोट निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा

पुणे : पुण्यातील कसबा पेठ तसेच चिंचवड येथील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विविध समाजातील बांधवांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी सकारात्मकता दाखवली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्तिती होती. यावेळी शिंदे यांनी पुण्यातील महत्वाच्या प्रश्नांवर देखील चर्चा केली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले कि, पोट निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रामुख्याने मराठा समाज, तेली समाज, भोई समाज, ब्राह्मण समाज, राजपूत समाज, बंजारा समाज, जोशी समाज, भटक्या आणि विमुक्त जमाती, ख्रिश्चन समाज, बोहरी समाज, पंजाबी समाज, भवरी, शिंपी, धोबी, बागवान, मुस्लिम, कासार, असे बारा बलुतेदारातील समाजांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
याशिवाय पुणे मनपा कर्मचारी, मारवाडी समाज, संत निरंकारी समाज, पद्मसाळी समाज यांनी देखील आपापले विषय यावेळी मांडले. तसेच पुण्यातील पेठांमधील जुन्या आणि धोकादायक वाड्यांच्या पुनर्विकासाचा विषय, वाढत्या वाहतुक कोंडीचा विषय, शहरांतर्गत पार्किंगची समस्या, पुण्यातील भिडेवाड्याचा प्रश्न, सोन्याचे कारागिरांच्या संबंधित विषय देखील लवकरात लवकर बैठका घेऊन मार्गी लावण्याबाबत नागरिकांना आश्वस्त केले. तसेच ब्राम्हण समाज या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीवर नाराज नसून तो सोबत असल्याचेही यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी आ. प्रवीण दरेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्या सह मराठा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.