माजी खासदार अनंतराव देशमुख , माजी आ. सोनकवडे, संग्राम कुपेकर यांच्यासह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश
विदर्भातील ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी खासदार अनंतराव देशमुख , त्यांचे पुत्र नकुल , चैतन्य, नाशिकचे माजी खा . कै. डॉ. वसंत पवार यांच्या कन्या अमृता , लातूर जिल्ह्यातील माजी आ. धर्माजी सोनकवडे , कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्राम कुपेकर, यांच्यासह विविध पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मंडळींच्या साह्याने राज्याच्या विकासाला आणखी गती देण्याचे काम करू , असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन , प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. हरीश पिंपळे, आ. तान्हाजी मुटकुळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , संजय केणेकर , विजय चौधरी , मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्यांमध्ये माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप , उबाठा सेनेचे माजी पुणे शहरप्रमुख व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शाम देशपांडे , शाहीर परिषदेचे मनोहर महाराज धांडगे आदींचा समावेश होता. अनंतराव देशमुख यांच्यासमवेत वाशीम जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य , बाजार समित्यांचे अनेक पदाधिकारी यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले. फडणवीस म्हणाले की, अनंतराव देशमुख यांच्यासारख्या जमिनीवरच्या नेत्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करावा ही आमची अनेक वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली. पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांच्या विकासकामांविषयीच्या मागण्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील , असेही त्यांनी नमूद केले.
अनंतराव देशमुख हे वाशीम चे माजी खासदार असून राज्याचे माजी अर्थराज्यमंत्रीही आहेत. संग्राम कुपेकर हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी असून २०१४ व २०१९ मध्ये त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.