शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करून त्यांच्यात संशोधनवृत्ती निर्माण करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या बोऱ्हाडेवाडी येथील मुलींसाठी असलेल्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी वसतिगृह आणि महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणासह मुलींच्या शिक्षणावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासाठी अशाप्रकारची वसतिगृहे अतिशय महत्त्वाचे माध्यम ठरेल, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. याशिवाय संस्थेने मुलींना संशोधनावर अधिकाधिक भर देण्यासाठी प्रोत्साहित करण्याची सूचना देखील त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि , आज संपूर्ण जग आपल्या देशात होणाऱ्या वेगवेगवेगळ्या संशोधनाकडे लक्ष ठेवून आहे. गेल्या दोन वर्षात देशात  संरक्षण क्षेत्रातील उत्पादन वाढले  आहे. कारण आपण त्याप्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील  उत्पादनावर होणारा खर्च टाळण्यासाठी या क्षेत्राशी संबंधित संशोधनावर भर देण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी अशा  शैक्षणिक सुविधा निर्माण करून त्यांच्यात संशोधनवृत्ती निर्माण करावी. या संशोधनामुळे देश समृद्ध होण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले.

नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक महिलांना शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचादृष्टीने महिला शिक्षणाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. विद्यार्थीनीच्या जीवनात वसतिगृहाचे महत्वपूर्ण स्थान आहे. मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने  ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय होण्यासाठी अतिशय उत्तम दर्जाच्या वसतिगृहाची उभारणी केली आहे. येथील विद्यार्थीनी शैक्षणिक जीवनात  वसतिगृह जीवनाचासुद्धा आनंद घेतील. येत्या काळात येथे लवकरच ‘फार्माडी’ अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात येईल.

नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला महत्व देण्यात आले. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके मराठीत करण्यात येणार आहे. इंग्रजी विषयाचे ज्ञान रूपांतरित स्वरूपात मराठीत मिळण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

यावेळी आमदार महेश लांडगे, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य शशिकांत ढोले आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!