शास्त्रीय नृत्यकला आणि लोककलेला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

3

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आयोजित आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत ‘नृत्यवंदना’ हा अनोखा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. तब्बल ७५० कलाकारांनी २४ समूहात सादर केलेल्या कलाकृती डोळ्यात साठवाव्या अशाच होत्या. चंद्रकातदादांनी राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय म्हणावा लागेल. शास्त्रीय नृत्यकला आणि लोककलेला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे संगीत आणि नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलेचा हा ठेवा जपण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, तसेच कोथरुडमध्ये नृत्यसंकुल उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. हिंदू संस्कृतीत शास्त्रीय नृत्य कला आणि लोककलेच्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण यातूनच अनेकांना मानसिक समाधान मिळते. आपल्या संस्कृतीचे महत्त्व ओळखूनच आगामी काळात अनेक परदेशी नागरिक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे कलेला प्रोत्साहन देणे हे आपलं कर्तव्य असल्याचे पाटील म्हणाले.

कोथरुड हे संस्कृतीचे माहेरघर आहे. त्यामुळे इथे नृत्यकलेच्या संवर्धनासाठी नृत्यसंकुल उभारण्याची मागणी आहे. आयोजकांनी नृत्य संकुल उभारण्यासाठी जागेचा शोधा घ्यावा, पालकमंत्री या नात्याने त्यासाठी सर्वतोपरी मदत करु. तसेच लवकरच नृत्यसंकुल उभारण्यासाठी प्रयत्न करु, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर शास्त्रीय नृत्य कलाविष्कार सादर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करु, असेही त्यांनी सांगितले.
नृत्यवंदना कार्यक्रमात ७५० नृत्यकलाकार‌ सहभागी झाले असून, २४ समुहांनी नृत्यविष्कार सादर केले. यावेळी व्यासपीठावर पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना शमा भाटे, मनिषा साठे, सुचेता चाफेकर, आयोजक अजय धोंगडे, पुनीत जोशी, माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संदीप खर्डेकर, शाम देशपांडे, माधुरी सहस्रबुद्धे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.