पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामास भेट

पुणे : पुण्यातील बंडगार्डन येथील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाची आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. नदीच्या दोन्ही बाजूस स्थानिक प्रजातीची झाडे लावावी, नदी किनाऱ्यावर नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याचा आनंद मिळेल अशा पद्धतीने कामे करण्यात यावी, अशा सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम एकूण ११ भागात विभागण्यात आले असून त्यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन पूल आणि बंडगार्डन पूल ते मुंढवा या कामासाठी मार्च २०२२ मध्ये आदेश देण्यात आले असून ही कामे सुरू करण्यात आली आहेत. कामाचा प्रथमत: ३०० मीटरचा भाग पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी आज शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अभियंता जगदीश खानोरे आदी उपस्थित होते.