यूपीएससी परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना चांगले यश मिळावे यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरु – चंद्रकांत पाटील

अमरावती : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज अमरावती दौऱ्यावर आहे. पाटील यांनी प्रथम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मयोगी गाडगेबाबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. नंतर श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता, नवीन वास्तूचे लोकार्पण व ‘अमृतघन’ या ग्रंथाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यासोबतच चंद्रकांत पाटील यांनी अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. यावेळी आमदार प्रवीण पोटे, खासदार अनिल बोन्डे तसेच सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचे टक्के वाढविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यूपीएससी परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना चांगले यश मिळावे यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या जुन्या इमारतीत मदत केंद्र ही सुरू करण्यात येणार असल्याचे सांगत तेथे मार्गदर्शन वर्गही सुरू करण्याचा प्रयत्न असून या वर्गाला दिल्ली येथील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन मिळू शकेल व त्याचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.