विशाखापट्टणम येथे कर्तव्य बजावताना अमरावतीचे सुपुत्र जवान पराग मोरे शहीद; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

6

मुंबई : विशाखापट्टणम येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र, वीर जवान पराग मोरे (वय ३२) यांना दुर्दैवी वीरमरण आले. या अत्यंत दुःखद घटनेबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त करत शूर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अमरावतीच्या साईनगर/खंडेलवालनगर परिसरातील रहिवासी असलेले पराग मोरे हे विशाखापट्टणम येथे देशसेवेचे कर्तव्य पार पाडत होते. तेथे लष्करी सरावादरम्यान गोळी लागल्याने त्यांना वीरमरण आले. नुकतेच अमरावती येथे अत्यंत नम डोळ्यांनी व शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून भारतीय सैन्य दल, पोलीस प्रशासन आणि हजारो नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले, मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान पराग मोरे यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. राष्ट्रसेवेसाठी दिलेले त्यांचे योगदान आणि त्याग देश सदैव स्मरणात ठेवेल. मी या शूर वीरास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि मोरे कुटुंबीयांना हे अथांग दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Get real time updates directly on you device, subscribe now.