पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या विविध विषयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

8

अमरावती : अमरावती महापालिकेच्या कामकाजाचा शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. पाटील यांनी प्रथम पालिकेच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांनतर पाटील यांनी कामकाजाची माहिती घेतली.  घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा याची योग्य अंमलबजावणी करावी तसेच भुयारी गटार योजनेसंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा. याबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

प्रधानमंत्री आवास योजना, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन योजना, स्वच्छता सेवा नियोजन, मनपा निधी बाबत, मनपा कार्यान्वित अन्य प्रकल्प व उपक्रम यांसह विविध विषयांवर चर्चा करुन माहिती घेतली. यापैकी मंजूर निधीची कामे त्वरित मार्गस्थ करावे असे निर्देश दिले. तसेच, योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी समन्वयाने सोडवून कामाला युद्धस्तरावर गती द्यावी. अमरावती शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या सुचना यावेळी पाटील यांनी दिल्या .
पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन योग्यरित्या होण्यासाठी महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराकडून घनकचरा व्यवस्थापन नियमितपणे करुन घ्यावे. यासाठी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे. ही कामे नियमितपणे होत आहे, याबाबत खातरजमा करावी. अमरावती पाणीपुरवठा योजना अमृत 2.0 अंतर्गत सिंभोरा ते नेरपिंगळाई या मार्गावरील प्रस्तावित पोलादी पाईपलाईनचे कामे तसेच जलशुध्दीकरण केंद्र जलवाहिनीच्या प्रस्ताव तातडीने मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच जिल्ह्यातील पाणीपुरवठा नियमित होण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, तुषार भारतीय उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.