स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विमोचन

16

अमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर डॉ. मनिष गवई लिखित ध्येयवेडा कुलगुरू पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाचा विमोचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी चंद्रकांत पाटील म्हणाले की, कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे हे विद्यार्थी केंद्री धोरण राबविणारे कुलगुरु तसेच उत्कृष्ट प्रशासक होते. विद्यापीठामध्ये काम करताना अल्पावधीत विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय बनले. त्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे प्राध्यापकांसह विद्यार्थीही प्रभावित झाले होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे एक अभ्यासू, दूरदृष्टी असणारा मार्गदर्शक तसेच शिस्तप्रिय व्यक्ती हरपला. त्यांनी केलेले कार्य पुढील पिढीला मार्गदशक ठरावे यासाठी त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकामध्ये स्मृती स्वरुपात जतन करण्यात आले आहे. या पुस्तकांच्या रुपाने त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, आमदार प्रतापदादा अडसाद, कुलसचिव तुषार देशमुख, डॉ. दिलीप मालखेडे यांच्या पत्नी डॉ. दिपाली मालखेडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.