सोलापूर : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच टंचाई बाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यात जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांसह ऊस ज्वारी हरभरा , तुर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनास तात्काळ सादर करावा, असे निर्देश पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच टंचाईबाबत आढावा बैठक देखील घेण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कि ,शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभागाने प्रलंबित ई-केवायसीचे कामही जलदगतीने पूर्ण करुन घ्यावे. पिक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीचे वेळेवर पैसे मिळणेही अत्यंत गरजेचे असून मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या प्रलंबित पिक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच पिक विमाची प्रक्रीया करताना काही त्रुटी आढळल्यास त्या दूर कराव्यात. यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.
यावेळी चारा व पाणी टंचाई बाबतचाही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होईल याबाबत पशुसंवर्धन व कृषी विभागाने नियोजन करावे. तसेच धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे. त्याचबरोबर मराठा कुणबी नोंदीची तपासणी तात्काळ पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्र. जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रांताधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदूणे, अमित माळी, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.