आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीच्या पूर्वनियोजनाबाबत सोलापूर येथील नियोजन भवनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न
सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीच्या पूर्वनियोजनाबाबत सोलापूर येथील नियोजन भवनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. दरम्यान, श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात. पालखीबरोबर पायी येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखीच्या मार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक मनुष्यबळ नेमण्याच्या सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत आषाढी वारी पालखी सोहळ्यात पालखीचा मार्ग, तळ, विसावा, रिंगण सोहळा या ठिकाणी पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी योग्य दक्षता घेऊन प्रत्येक विभागांने नियोजन करावे. भंडीशेगाव येथील पालखी तळावर पाणी साठणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि बांधकाम विभागाने समन्वयाने काम करावे. या कामासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन निधीतून उपलब्ध करण्यात येईल. वारी कालावधीत भाविकांना कोणत्याही समस्येबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात अडचण येऊ नये, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, अशा महत्वपूर्ण सूचना या वेळी देण्यात आल्या.
या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल – अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सा. बां. अधिक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.