2024 ची निवडणूक ही स्वराज्यासाठीची दुसरी लढाई! – नितीन बानुगडे-पाटील
विरार : ‘2024 ची निवडणूक ही स्वराज्यासाठीची दुसरी लढाई आहे. राष्ट्राचे रक्षण करणे, हा आपला महाराष्ट्र धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला तो महाराष्ट्र धर्म दिला आहे. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर आक्रमणे झाली; त्या त्या वेळी महाराष्ट्र एकजुटीने उभा राहिला आहे. ही निवडणूक आपले भविष्य घडवणारी निवडणूक असणार आहे. त्यामुळे आपण सजग आणि सावध असले पाहिजे,` अशा ऊर्जेने भारलेल्या शब्दांत नितीन बानुगडे-पाटील यांनी ‘निर्भय बनो` व महाविकास आघाडीच्या संयुक्त कार्यकर्ता महामेळाव्यात शिवचैतन्य निर्माण केले.
‘भारत जोडो, निर्भन बनो` व महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा संयुक्त ‘महामेळावा` शनिवार, 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता नालासोपारा (पश्चिम) येथील तानिया बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. शिवव्याख्याते तथा शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांच्या ओजस्वी शब्दसामर्थ्याने उपस्थित कार्यकर्त्यांना शिवप्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेली ‘मशाल` प्रज्वलित केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून आपल्या ‘विजयी पर्व` भाषणाला सुरुवात केली.
पालघर जिल्हा हा अशोक सम्राटाची भूमी आहे. अनेक जाती-धर्मांच्या मंदिरांचा वारसा जपणारा हा जिल्हा आहे. चिमाजी आप्पांच्या पराक्रमाचा संपन्न वारसा असलेली भूमी आहे. देशातील पहिला आण्विक ऊर्जाप्रकल्प असलेला हा जिल्हा आहे. आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेला हा जिल्हा आहे. तसेच निसर्गाचे भरभरून दान मिळालेली ही भूमी आहे. वारली चित्रकलेचा हा जिल्हा आहे. साऱ्यांच्या समतेच्या-समानतेच्या धाग्यात गुंफलेला हा जिल्हा आहे, असे ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण दाखले देत नितीन बानुगडे-पाटील यांनी पालघर जिल्ह्याची महती अधोरेखित केली.
पण त्याचबरोबर विक्रमी वेळा पक्षांतर केलेल्या खासदारांचाही हा जिल्हा आहे, अशा शब्दांत त्यांनी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यावर शब्दप्रहारही केले. तर 2024 मध्ये पालघरच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडून येणाऱ्या भारतकन्या भारतीताई कामडी यांचाही हा जिल्हा आहे. वसईवर चिमाजी आप्पा यांनी भगवा फडकवला आणि मराठी पंरपरांचा संपन्न वारसा इथे सुरू झाला. 1942 च्या चळवळीत अग्रस्थानी असताना देशासाठी पाच हुतात्मा देणारा हा जिल्हा आहे, अशा शब्दसुमनांनी बानुगडे-पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली. अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे. आपल्याला केवळ मतदान करून हे स्वातंत्र्य टिकवायचे आहे. ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. या दुसऱ्या स्वातंत्र्याचे आपण सैनिक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित मतदारराजा आपल्याला बनायचे आहे, याची जाणीव नितीन बानुगडे-पाटील उपस्थितांना या प्रसंगी करून दिली.
काळ पुढे आला. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून या देशाचा गौरव झाला. पण नंतरच्या काळात मतपेट्या पळवल्या जाऊ लागल्या. नंतर आमदार पळवून नेऊ लागले. आणि आता पक्षच पळवून नेले जातायत, अशा शब्दांत नितीन बानुगडे-पाटील उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. शिवसेना फोडली. सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला. का फोडली? जिथे गंगेच्या पात्रात मृतदेह वाहत होते, त्या कोरोच्या काळात उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्र सुखरूप ठेवला. देशातील पाच मुख्यमंत्र्यांतील एक म्हणून उद्धवजींचा कायम गौरव झाला. त्या पडत्या काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गतिमान ठेवली. महाराष्ट्र थांबला नाही; थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिली. 80 हजार कोटींची परकीय गुंतवणूक आणून महाराष्ट्र त्यांनी पहिल्या क्रमांकावर ठेवला. उद्योग-धंदे, रोजगार वाढवले; ते उद्धव ठाकरे लोकमान्य ठरत आहेत, हे त्यांनी पाहिले आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू केले. महाराष्ट्रातील उद्योग-धंदे गुजरातला न्यायचे, आरेचे जंगल मेट्रोला द्यायचे होते, धारावी अदानीला द्यायची होती आणि वाढवण बंदर करायचे होते म्हणूनच यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नको होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून उद्धवजी ठाकरे यांना तुम्ही उतरवू शकता; पण जनतेच्या मनातून काढून टाकू शकत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्रद्वेषी गद्दारांचा नितीन बानुगडे-पाटील यांनी समाचार घेतला.
विकास हवा आहे. पण पालघर जिल्ह्यात होत असलेला विकास हा विनाशकारी आहे. इथे सर्वसामान्य जनतेचा वाढवण बंदराला विरोध आहे. भूमिपुत्रांच्या छाताडावर विकासाच्या इमारती उभ्या राहणार असतील तर त्यांचा उपयोग तरी काय? असा प्रश्न करत नितीन बानुगडे-पाटील यांनी पालघरकरता शाश्वत विकासाची अपेक्षा व्यक्त केली. जनतेला अपेक्षित त्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे, असे वचनही त्यांनी दिले.
देशात आज निर्वाचित एकाधिकारशाही वाढत आहे. स्वीडनमधील एका संस्थेच्या अहवालाचा दाखला देत त्यांनी ही माहिती दिली. देश आज कोणत्या दिशेने चाललाय? या प्रश्नातून विचारप्रवृत्त करत राज्याला व देशाला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी जनता म्हणून आपली आहे, असे त्यांनी सांगितले. 2024 ची निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे. भाजप विरोधी जनता अशी ही लढाई असणार आहे. गद्दार विरोधी निष्ठावंत अशी ही लढाई असणार आहे. राज्य निष्ठेने उभे राहत असते. तेव्हा महाराष्ट्र राज्यासोबत आपण निष्ठा जपायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
दरम्यानच्या मार्गदर्शनात त्यांनी महागाई, पेट्रोलचे दर, वाढता भ्रष्टाचार, गॅसच्या वाढलेल्या किमती, शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार, 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन, मोदी गँरंटी, वाढलेली बेरोजगारी आणि देशवासीयांचे अन्य देशांत होत असलेले स्थलांतर अशा गंभीर विषयांनी जनतेचे जगणे महाग केले असल्याचे ते म्हणाले आणि हीच मोठी शोकांतिका असल्याची खंत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. देश जनता घडवते. आपण इतिहास घडवण्यासाठी उभे आहोत. त्यामुळे हा बदल आपल्यालाच घडवावा लागेल, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना सरतेशेवटी शिवप्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी नितीन बानुगडे-पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी व्यासपिठावर पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारतीताई कामडी, काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील, जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कदम, आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे, जिल्हाध्यक्ष जॉन परेरा, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुमार राऊत, सीपीएम पक्षाचे के. के. प्रकाशन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पालघर जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद वैद्य, लोकसभा संघटक जनार्दन पाटील, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, नम्रता वैती, भारत जोडो अभियानचे ब्रायन लोबो, राजू भिसे, मॅकेन्झी डाबरे, समीर वर्तक आणि ‘निर्भय बनो` अभियानचे रमाकांत पाटील, आदिवासी एकता परिषदचे दत्ता सांबरे, सर्व धर्मीय संविधान बचाव समितीचे दत्ता धुळे, कर्नल बर्वे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. महामेळाव्याचा समारोप जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून केला.
भाजपने हिंदू धर्म धोक्यात आणला!
भाजपने धर्माधर्मात तेढ निर्माण केले आहे. या निवडणुकीनिमित्ताने धार्मिक युद्ध सुरू झाले आहे. हिंदू धर्म धोक्यात आणण्याचे काम भाजपने केले आहे. सदाचार हा हिंदू धर्माचा आत्मा आहे. पण मोदी सरकारने हिंदू संस्कृतीची हत्या केली आहे. परंतु आपल्या सर्वांना मिळून हिंदू धर्माचे संरक्षण करायचे आहे. त्यासाठी आपल्याला मोदींना हरवायचे आहे. ज्यांना सत्याची चाड आहे; अशा सर्वांनी मोदींना हरवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन फादर मायकल यांनी या प्रसंगी केले.
फादर मायकल यांचे बविआला अनावृत्त पत्र!
बहुजन विकास आघाडी हा ताकदवर आणि पैसेवाल्यांचा पक्ष आहे. त्यांनी उमेदवार दिल्यास अपशकून होऊ शकतो. त्यांनी आपला उमेदवार उभा करू नये किंवा भाजपला साथ देऊन नये. त्यांनी मोदींना साथ दिल्यास त्यांचा भ्रष्टाचाराला पाठिंबा असल्याचा समज जनतेत जाईल. त्यापेक्षा इंडिया गंठबंधनला त्यांनी पाठिंबा द्यावा, अशा आशयाचे अनावृत्त पत्र आपण बविआला लिहिले असल्याची माहिती फादर मायकल यांनी या प्रसंगी दिली.