टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांची साधी राहणी, कर्तृत्व, नेतृत्व, देशभक्ती आणि दूरदृष्टी नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : देशाच्या औद्योगिक समूहातील महत्वपूर्ण आणि मोलाचे पान असलेल्या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी 9 ऑक्टोबररोजी रात्री उशिरा मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एका निवेदनात रतन टाटा यांचे निधन झाल्याचे सांगितले. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग विश्वाबरोबरच देशाच्या सामाजिक जाणीवेतही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख, महान देशभक्त आणि पद्मविभूषण किताबाने सन्मानित श्री. रतनजी टाटा यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांनी केवळ भारतीय औद्योगिक क्षेत्राला नवीन उंचीवर नेले नाही, तर आपल्या सामाजिक कार्यांद्वारेही असंख्य जीवनांमध्ये सकारात्मक बदल घडवला. त्यांची साधी राहणी, कर्तृत्व, नेतृत्व, देशभक्ती आणि दूरदृष्टी नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे म्हणत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.