ग्रंथालय संचालनालयांतर्गत हस्तलिखित सल्लागार समिती गठित – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

13

मुंबई : महाराष्ट्रातील दुर्मीळ हस्तलिखिते, प्राचीन ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे संवर्धन व जतन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी हस्तलिखित सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. यामुळे हस्तलिखितांच्या संवर्धनाला चालना मिळाल्यास भावी पिढ्यांसाठी अमूल्य ऐतिहासिक ठेवा सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अंतर्गत ग्रंथालयांमध्ये जतन करण्यात येणाऱ्या जुन्या व दुर्मीळ पुस्तकांसह हस्तलिखितांच्या संरक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने समिती स्थापन केली असून समितीच्या अध्यक्षपदी ग्रंथालय संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पुढील तीन वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे.

या समितीमध्ये पद्मश्री डॉ. अच्युत पालव, संशोधक तेजस्विनी सचिन पाठक, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे डॉ. श्रीनंद लक्ष्मण बापट, इतिहासतज्ज्ञ डॉ. सूरज पंडित तसेच डेक्कन कॉलेजचे प्रा. अभिजित दांडेकर अशा तज्ज्ञांचा समावेश आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी (हस्तलिखित विभाग) हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. विविध क्षेत्रांतील हस्तलिखित केलेले जुनी व दुर्मीळ पुस्तके, नियतकालिके व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाची आणि इतर कागदपत्रे शासनास मिळवून देण्यासाठी समिती काम करेल. समितीच्या प्रतिवर्षी किमान दोन बैठका अध्यक्षांच्या अनुमतीने घेण्यात येतील.

समितीचे कार्य पुढील प्रमाणे असेल

जुनी व दुर्मीळ पुस्तके,नियतकालिके,हस्तलिखिते व शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे असतील असे इतर कागदपत्र शासनास मिळवून देणे.

खरेदी करावयाच्या हस्तलिखितांची व दुर्मीळ ग्रंथांची योग्य किंमत ठरविणे.

हस्तलिखित संग्रहालयाच्या अनुषंगिक सर्व बाबी संबधित शासनास सल्ला देणे.

ही समितीला दरवर्षी किमान दोन बैठका घेणे आवश्यक असून वेळोवेळी अहवाल शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे .

Get real time updates directly on you device, subscribe now.