उमेश पाटलांचे “राष्ट्रवादी पुन्हा”; अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीत प्रवेश

141

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार ) मुख्य प्रवक्ते राहिलेले उमेश पाटील यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेत्यांशी असणाऱ्या मतभेदामुळे विधानसभेला पक्ष विरोधात काम करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांना यावेळी पराभवाला सामोरे जावे लागले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांचा याठिकाणी विजय झाला. काल उमेश पाटील यांनी उपमुखमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या देवगिरी निवासस्थानी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

आपल्या एक्स अकाउंटद्वारे पोस्ट करत उमेश पाटील यांनी या संबंधी माहिती दिली आहे. ज्यामध्ये पाटील म्हणतात कि ” विधानसभा निवडणुकी पुर्वी मी माझ्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता.परंतु इतर कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता.सोलापुर जिल्ह्यातील “मोहोळ विधानसभा” या राखीव मतदारसंघा मधील मातब्बर प्रस्थापित नेत्या सोबत टोकाचे मतभेद झाल्यामुळे मी नाईलाजाने पक्ष त्याग केला होता.मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजितदादांच्या नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात होती हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता होती.त्यामुळे मी व माझ्या सर्वपक्षीय सहका-यांनी मिळुन 15 दिवसात स्वतःचा उमेदवार देऊन (राजू खरे) विधानसभेला 30 हजार मताधिक्याने निवडून आणला.अजित दादांनी उमद्या मनाने स्वत:च्या पक्षाचा आमदार पडला तरी माझ्या जिगरबाज लढाऊ बाण्याचे कौतुक केले.मी दादांना कधी सोडले नव्हते.फक्त एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता इरेला पेटला तर अपराजित मातब्बर नेत्याला देखिल पराभूत करू शकतो हे सिद्ध करायचे होते.माझा देवगिरी येथे सर्व मंत्री,आमदार व पार्थ दादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या हस्ते झालेला पुन्हा पक्ष प्रवेश ही तांत्रिक बाब आहे.मी कधीही अजितदादांना सोडले नव्हते…फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती..इतकच

या प्रवेशानंतर पक्षांतर्गत चर्चेला उधाण आलं आहे. विधानसभेला पक्ष विरोधी काम करणारे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार हा माझा स्वतःचा उमेदवार होता आणि आम्ही ३० हजाराच्या मताधिक्याने तो निवडून आणला हे सांगणाऱ्या उमेश पाटील यांना पुन्हा पक्षात घेऊन नक्की कार्यकर्त्यांमध्ये कोणता संदेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीला द्यायचा आहे ? पवारांची साथ सोडून अजित दादांसोबत आलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना हि मुभा पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात येणार आहे का ? विधानसभा निवडणुकीच्या कोणत्या रणनीतीचा हा भाग होता ? कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहणे गरजेचे आहे कि नाही ? हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.