तापमानाचा पारा वाढला… उष्णतेला हरवा… हि घ्या खबरदारी

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील तापमान सातत्याने नवे उच्चांक गाठत आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच पुण्यात उकाडा वाढला आहे. शहरातील कमाल तापमान ४१ अंश सेल्सियसच्या पुढे गेले असून उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाची झळ जाणवत आहे. पुढील दोन दिवसात जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यानुषंगाने उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना या लेखाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी उष्माघाताच्या स्थितीत काय करावे व काय करू नये याबाबत जाणून घेवू या…
खालीलप्रमाणे उपाययोजना करा:
- भरपूर पाणी प्या – दिवसभर नियमितपणे पाणी प्या, विशेषत: गरम हवामानामध्ये तहान लागली नसतानाही पाणी प्या.
- द्रव पदार्थ घ्या – घरून आणलेले ताक, लिंबूपाणी , नारळ पाणी , फळांचे रस असे द्रव पदार्थ घ्या. यासोबतच कलिंगड, खरबूज, टरबूज, द्राक्ष, अननस, काकडी हे पदार्थ आहारात ठेवा.
- उन्हात कमी वेळ घालवा – शक्य असल्यास, उन्हात जाण्याचा वेळ कमी करा, विशेषत: दुपारी 12 ते ३ या वेळेत.
- हलके कपडे घाला – सैल आणि हलके कपडे घाला, जेणेकरून हवा खेळती राहील.
- धूप आणि उन्हापासून संरक्षण – टोपी, छत्री किंवा इतर साधनांचा वापर करून थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा.
- गरम पेये टाळा – चहा, कॉफी आणि इतर गरम पेये टाळा, थंड पेये प्या.
- खूप व्यायाम टाळा – गरम हवामानात जास्त व्यायाम करणे टाळा.
- उष्णतेची लक्षणे ओळखणे – उष्णतेची लक्षणे म्हणजे उदा. डोकेदुखी, चक्कर येणे, घाम येणे, अशी लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना संपर्क साधा.
- प्रवासात जपा – प्रावासावेळी पाण्याची बाटली जवळ बाळगा.
- हवामानाची माहिती – स्थानिक हवामानाच्या बातम्यांसाठी रेडिओ ऐका, टीव्ही बघा व वृत्तपत्र वाचन करा.
- घरातील वातावरण – दिवसा घरातील खिडक्या बंद ठेवून पडदे सरावेत, जेणेकरून थेट सूर्यप्रकाश घरामध्ये येणार नाही . तसेच रात्रीच्या वेळी खिडक्या उघडाव्यात , जेणेकरून गार हवा घरामध्ये येऊ शकेल.