महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! १९,१४२ कोटींच्या नाशिक–सोलापूर–अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने (CCEA) महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्राला मोठी गती देणारा निर्णय घेतला आहे. १९,१४२ कोटी रुपये खर्चाच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक–सोलापूर–अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राने अधिकृत मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
हा नवीन कॉरिडॉर नाशिक, सोलापूर आणि अक्कलकोट या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा असून, यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सहा पदरी आणि पूर्णपणे नियंत्रित प्रवेश (Access-controlled) असलेला हा मार्ग शेतीमाल वाहतूक, व्यापार आणि उद्योगांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे एक दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या या भरीव योगदानाबद्दल मी पंतप्रधान मोदीजींचे आभार मानतो, असे पाटील यांनी म्हटले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडली असून, राज्याच्या विकासाचा वेग आता अधिक वाढणार आहे.