शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माय-लेकरांचा संसार खाक; नगरसेविका स्नेहा कलाटेंकडून तातडीचा मदतीचा हात

10

वाकड : वाकड येथील मुंजोबा नगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत श्रीमती सुमन राठोड यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. १५ वर्षांपासून पतीच्या निधनानंतर संघर्षाने उभा केलेला हा छोटासा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असला, तरी सुदैवाने सुमनबाई आणि त्यांचा मुलगा या दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत. या संकटकाळी विद्यमान नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी या कुटुंबाला तत्काळ आधार दिला आहे.

श्रीमती सुमन राठोड या गेल्या १५ वर्षांपासून विधवा म्हणून आपल्या मुलाचा सांभाळ करत आहेत. रोजंदारीवर काम करून, कष्ट उपसून त्यांनी आपल्या मुलाचे संगोपन केले. मात्र, अचानक लागलेल्या आगीत घरातील भांडी-कुंडी, कपडे-लत्ते आणि साठवलेले सर्व साहित्य जळून नष्ट झाले. १५ वर्षांची मेहनत एका क्षणात डोळ्यांसमोर जळताना पाहून राठोड कुटुंबीय हवालदिल झाले होते. या घटनेची माहिती मिळताच नगरसेविका स्नेहा   रणजित कलाटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. कुटुंबाची परिस्थिती पाहून त्यांनी तातडीने मदतीचा पुढाकार घेतला. स्नेहा कलाटे यांनी आपल्या वतीने राठोड कुटुंबाला संसारोपयोगी भांडी, जीवनावश्यक वस्तू आणि कपडे-लत्ते सुपूर्द केले.

यावेळी बोलताना स्नेहा कलाटे म्हणाल्या की, “एका महिलेने अत्यंत संघर्षातून उभा केलेला संसार डोळ्यांसमोर जळताना पाहणे खूप वेदनादायक आहे. एक महिला प्रतिनिधी म्हणून त्यांच्या दुःखद प्रसंगी पाठीशी उभे राहणे ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. ही मदत केवळ वस्तूंच्या स्वरूपात नसून त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी दिलेला एक माणुसकीचा आधार आहे.”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.