ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना ३८ वा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान; सोहळ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे : पुणे येथील त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा मानाचा ३८ वा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ उद्योगपती आणि ‘फोर्स मोटर्स’चे अध्यक्ष अभय फिरोदिया यांना प्रदान करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून फिरोदिया यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, उद्योग, रोजगारनिर्मिती आणि देशाच्या औद्योगिक प्रगतीमध्ये अभयजी फिरोदिया यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याचा गौरव ‘पुण्यभूषण’सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराने होणे ही पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे.
तसेच, देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी आणि सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या हल्ल्यात अपंगत्व आलेल्या जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेला मानाचा मुजरा अर्पण करताना संपूर्ण सभागृह भावूक झाले.
हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. उद्योग क्षेत्रातील अभय फिरोदिया यांचे अतुलनीय योगदान आणि पुण्याच्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीत त्यांनी दिलेल्या सहभागाबद्दल हा सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सकाळ समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रतापराव पवार, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, उपमहापौर परशुराम वाडेकर, पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.